महाकुंभमुळे विविधतेत एकतेचे दर्शन : मोदी   

नवी दिल्ली : प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळ्यामुळे देशाच्या ऐक्याला मोठी चालना मिळाली आहे. विविधतेत एकतेचे दर्शनही महाकुंभमुळे घडले. एवढा मोठा उत्सव आयोजित करण्याची क्षमता भारतात असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.
 
महाकुंभ मेळा नुकताच यशस्वी झाला. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेत मोदी यांचे काल भाषण झाले. ते म्हणाले,  सरकार आणि नागरिकांच्या भरीव सहकार्याने मेळा यशस्वी झाला. सुमारे दीड महिना प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात कोट्यवधी भाविकांनी स्नान केले. भाविकांची गर्दी आणि उत्साह पाहता महाकुंभ मेळा देशाचे एक शक्तीस्थान झाला. ऐक्याचे अमृत असाच उल्लेख महाकुंभचा करावा लागेल.  मी नाही. आपण सर्व अशा भावनेने देशभरातील विविध भागांतून आणि परदेशातूनही भाविक प्रयागराजला आले. भाविकांची झालेली अलोट गर्दी भारताच्या ऐक्याचे सामर्थ्याचे दर्शन घडविणारी होती.  तसेच देशाचे ऐक्य तोडण्याचे प्रयत्न करणार्‍यांना महाकुंभ मेळा एक प्रकारे थप्पड होती. विविधतेत एकता हा भारताचा वारसा आहे. तो महाकुंभ मेळ्यात पुन्हा दिसला. तो संदेश आपण भविष्यातही समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे.    

स्वातंत्र्यचळवळीला महाकुंभमुळे प्रेरणा 

विविध प्रांतांतून आलेले बहुभाषिक भाविक त्रिवेणी संगमाच्या काठावर हर हर गंगेचा जयघोष करताना दिसले. संगमावर एक भारत, श्रेष्ठ भारताची झलक दिसली. पर्यायाने एकतेचा संदेश मिळाला. महाकुंभ मेळ्याने यापूर्वी सुद्धा अनेकांना प्रेरणा दिली. त्यामध्ये १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध, सरदार भगतसिंग यांच्या हौतात्म्याचा क्षण, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची  चलो दिल्ली घोषणा किंवा महात्मा गांधी यांची दांडी मार्च या सारख्या स्वातंत्र्यचळवळींना महाकुंभने त्या त्या काळात एक प्रकारे प्रेरणा दिली. त्यामुळे स्वातंत्र्य अधिकच जवळ आले. देशाला जागृत करण्यात आणि नव्या उर्जेचा संचार करण्यात प्रयागराजचा महाकुंभ मेळा एक मैलाचा दगड ठरला आहे.

चेंगराचेंगरीवर निवेदन करण्याचा आग्रह 

महाकुंभ मेळ्यावेळी २९ जानेवारी रोजी दिल्ली रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरीचा प्रकार झाला होता. तेव्हा ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात त्याबाबतचा उल्लेख केला नाही,  तो करावा. त्याबाबत निवेदन करावे, अशी मागणी करत करत विरोधी पक्षांनी लोकसभेत गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज प्रथम दुपारी १ वाजेपर्यंत आणि नंतर काही काळानंतर दिवसभरासाठी बंद झाले.
 

Related Articles